जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा 'बाला'

जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा 'बाला'

गेल्या काही महिन्यातील हिट झालेले चित्रपट 
पाहिले असता असे दोन गोष्टी प्रामुख्याने
आढळतात.
एक म्हणजे चित्रपटाच्या विषय आणि कथानकाच्या बाबतीत घेतली जाणारी मेहनत वाढली आहे.ज्यामुळे एकाहून एक सरस चित्रपट पाहायला मिळत आहेत.कथानक चांगले नसेल तर कितीही मोठा हिरो असला तरी तो चित्रपट प्लॉप होतो हे उशिरा का होईना सिनेनिर्मात्यांना समजलेले दिसतेय.
दुसरी गोष्ट म्हणजे विषय कोणताही असो तो
विनोदी धाटणीने मांडण्याचा प्रयत्न होतोय जो 
बऱ्याच वेळा(टॉयलेट=सामाजिक संदेश+विनोद,
स्त्री=भय+विनोद,अंधाधून= रहस्य+विनोद )यशस्वी ठरलाय.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'बाला' सिनेमा याच पठडीतील आहे असे म्हणता येते.

पु ल देशपांडे राम नगरकर यांच्या 'रामनगरी' पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात,
'विनोदाचे दोन प्रकार असतात एक श्रेष्ठ विनोद  आणि दुसरा  कनिष्ठ विनोद. स्वतःवरती स्वतः च केलेला विनोद हा श्रेष्ठ विनोद असतो तर  आपण दुसऱ्या व्यक्तीवर केलेला विनोद हा कनिष्ठ प्रतीचा असतो. बाला सिनेमा हा कनिष्ठ विनोदाकडून श्रेष्ठ विनोदाकडे झालेला प्रवास आहे जो स्वतःच्या वैगुण्याला केवळ स्वीकारायलाच नाही तर त्यावर विनोद करायलाही शिकवतो.

जगात परिपुर्ण असे कुणीच नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये उणीवा असतात. 
समस्या तेंव्हा निर्माण होते जेव्हा या तुमच्यातील त्रुटी तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या आकांक्षा आणि स्वप्नांवर हावी होऊ लागतात.तुमच्यातील ती नसलेली गोष्ट
तुमचे विचार नकारात्मक बनवण्यास कारणीभूत ठरु लागते.
तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ लागतो.
 अशावेळी व्यक्तीकडे दोन पर्याय असतात, 
ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याचा स्वीकार करणे. पहिली गोष्ट सर्वजण करतात परंतु दूसरी गोष्ट सर्वानाच 
जमते असे नाही. 
स्वतः मधील ती नसलेली गोष्ट स्वीकारून किंबहुना त्या गोष्टीवर स्वतःच विनोद करून स्वतःचे आयुष्य तुम्ही आनंदी बनवू शकता हे 
'बाला' सिनेमा अतिशय प्रभावी पद्धतीने पटवून देतो.याशिवाय मुलींमधील गोरेपणाला दिले जाणारे अवास्तव महत्व,त्यांच्या या विचाराला पोषक वातावरण निर्माण करून स्वतःचा आर्थिक फायदा मिळवू पाहणाऱ्या सौन्दर्य प्रसाधनं कंपन्या यांसारख्या विषयावर सिनेमा परखडपणे व्यक्त होतो.
बदल्यत्या जीवनशैलीचा संदर्भ दर्शविण्यासाठी tiktok चा दिग्दर्शकाने खुबीने वापर केला आहे. ज्यामुळे  तरुणांना सिनेमा आपला वाटतो.
टिपिकल सोशल मेसेज देणाऱ्या गंभीर चित्रपटापेक्षा हेच विचार विनोदी पद्धतीने मांडणाऱ्या 'बाला'चे वेगळेपण अधिक भावते.
तुम्ही तुमचे आयुष्य जगा, जगासाठी तुम्ही बदलण्याची आवश्यकता नाही हे आपल्या मनावर बिंबवतो.

एकंदरीत टक्कल नसणाऱ्यानीही एकदा जरूर पहावा असा चित्रपट!

 
@vkpatil.
18/11/19
11/19

Comments

Popular Posts